बाळंतपण




नऊ मासाच्या प्रतिक्षेनंतर पाहिलं त्याचं मुख
आई म्हणून अनुभवलं मी ते जगावेगळ सुख

ते रडलं आणि मी हसले असा होता तो क्षण
आई म्हणाली, पूर्ण झाला बाळंतपणाचा पण

वाटलं राजा राणीचा पूर्ण झाला आता संसार
काव्यात वगैरे बोलायचे तर त्याला आली बहार

पण दोनच दिवसात मांडलेलं सगळं गणित फसतं
कळून चुकत आई होणं इतकं सोपं नसत

कित्ती दिले तरी अपुरेच पडतात त्याला चौवीस तास
सेंट आणि deo कुठले, नुसता शी आणि शु चा वास

हक्काचं माहेरपण आईबाबांनी ठेवलेली बडदास्त
सगळ्यांना हे बाळ गोड पण मला मात्र देत त्रास

कधी लागते उचकी तर कधी धरत श्वास'
कधी बिनसतं पोट तर कधी होतो gas

जेवण केलय आज आईने आवडीचे खास
पण सूर ह्याने काढला कि माझा अडकतोय घास

त्यातच इकडून तिकडून सूचनांचा पाऊस
हे करून बघ त्याला आणि हे नको खाऊस

डोक बांधून घे जरा कित्ती आहे पाऊस
दिवे लागणी झाली आता बाहेर नको जाऊस

कुणी म्हणे लागली असेल त्याला दृष्ट
काढून टाक एकदाची इडा पिडा होऊ देत नष्ट

सांभाळ बाई त्याला खूप आहेत infection
देऊन आणलंस का ग त्याला वेळेत injection

बाटली नको तिला चमचा वाटीच बरी
नीट लक्ष दे ती आहे आमची परी

मला ही ठाऊक आहे ह्या सूचनांमागचे प्रेम
म्हणून तर शक्यतोवर माझा नं बोलण्याचा नेम

पण मन मोकळ केलं माझं तर आईबाबांचे दुखावते
आणि नाही केलं तर बोलतात त्यांचे फावते

मलाही हवे वाटतात आत्ता माझेच आई आणि बाबा
तुम्ही आधी माझे अन मगच त्याचे आजी आणि आबा

कालपर्यंत होते मी कशी अगदी independent
पण अचानक आले कुणीतरी जे माझ्यावरती dependent

उठणं बसणं सारे माझे जोडलेलं त्याच्याशी 
कित्तीतरी दिवसात मी आले नाहीच माझी माझ्यापाशी

लाड करता तुम्ही सगळे जरी बाबा मावश्या आणि ताई
गांगरून गेलेय मी खरच त्याची नवखी आई

हळवी झाले गांगरले तरी माघार घेणार नाही
वेळ थोडा जाऊ दे फक्त नका करू घाई

अवघड असली तरी जबाबदारी आहे ही प्रेमळ
आणि पिल्लासाठी येतच नं शेवटी आईच्या पंखात बळ

मलाही कळू लागलेत हळूहळू त्याच्या रडण्याचे अर्थ 
आणि दिवसागणिक होतेच आहे मी आई म्हणून समर्थ

अजून द्यायचेत त्याला संस्कारांचे धडे 
गिरवून घ्यायची आहेत अक्षर आणि घोकून घ्यायचेत पाढे

प्रवास इथून तर सुरु होतो इथे संपत नाही
पण कळून चुकत इतकं सोपे नसते होणं आई




                                                               - कल्याणी बोरकर



Comments

Popular posts from this blog

My next book is for all of you: Untold Nakshatra Jyotish (Fifth Edition)

Life Summary Report

The mystic meaning of Shree Saraswathi Yanthram

Vedic Astrology: Saptavargaja Bala

My next upcoming Book: Vedic Astrology Practitioner Manual