मामी आजी - आठवण

आज थोडी personal पोस्ट लिहितेय आणि त्याबरोबर तिच्यावर पूर्वी एकदा केलेली कविता पोस्ट करतेय.


मामी आजी ही खरतर नात्याने माझी आजेसासू(आजेसासूबाई).... माझ्या सासूबाईची मामी.पण  मी तिला कधीच अहो-जावो केलं नाही , ती माझीही मामी आजीच होती.आज तिची खूप आठवण आली कारण मागच्या दिवाळीत गोव्याला मामीआजीबरोबर होतो आणि ह्या वर्षी ती दिवाळीला नसेल असे वाटलंही नव्हते.

 तिची आणि माझी पहिली भेट माझ्या लग्नात महणजे २००७ साली झाली...मी नऊवारी साडी नेसायची ठरवल्यापासून मला सासूबाई सांगत होत्या.. अग गिरीजा आणि मामी तुला नेसवेल नऊवारी..तू काळजी करू नको... पण मला नात्याने आजेसासू असणारी हो कोणीतरी आजी आणि तिच्याकडून नऊवारी नेसायची म्हणजे थोडे अवघडल्यासारखे वाटत होते..त्याचीच काळजी जास्त वाटत होती :) पण नवीन असल्याने मी काही बोलले नाही.. मग मामी आजीला लग्नाच्या आदल्या दिवशी पहिले, उंचपुरा बांधा, देखणा चेहरा असलेली, पांढऱ्या रंगाच्या नऊवारी मधली तिची प्रेमळ मूर्ती... ती माझ्याशी बोलली आणि इतके छान वाटले की त्यानंतर ती माझीही मामी आजीच  होऊन गेली अगदी कायमची........मग हक्काने इतकी वर्ष  मी गोव्याला देवीला जाताना तिच्या कडूनच  नऊवारी नेसून घ्यायचे.

तिच्या डोळ्यातच एवढे प्रेम होते कि बास तिचा शब्द सहसा कोणी डावलू शकत नसे.माझा तिच्या बरोबरचा सहवास म्हणजे काही मोजक्या भेटी... पण मला आठवतो..... तो तिचा प्रेमाने डोक्यावरून,चेहऱ्यावरून फिरवलेला हात......घरात अविरत पणे तिचं चाललेलं काम,तिने केलेला सुंदर स्वयंपाक, आग्रहाने तिचं वेगवेगळे पदार्थ खायला घालणे,मायेने सगळ्यांची विचारपूस करण,तिचं नीटनेटके आणि टापटीप राहणं, स्वतः सुगरण असून कोणी नवीन केलेला पदार्थ खाऊन तिनं त्याचे केलेलं कौतुक,येता जाता बोलण्यातून संसाराच्या ,जगण्याच्या सहज चार गोष्टी सांगणे आणि आम्ही जाताना "बरे करून रहाया"(मजेत रहा, काळजी घ्या) असे भरल्या डोळ्यांनी तिचे सांगणे....ज्याने निघताना पाय अगदी जड व्हायचे.घरादाराला ती माया लावायची हे खरं.

इथे आवर्जून सांगावेसे वाटते की सुनांना मुलांइतक्याच प्रेमाने वागवायची पध्दत फार मोजक्या घरात असते पण खूप मागच्या पिढीची असून मामी आजी मात्र त्यांना लेकीसारखी माया दयायची.
काही दिवसापूर्वीच जेव्हा तिला कळले की मला शिवलेल्या गोधड्या आवडतात तेव्हा लगेच तिने पुण्यात येणाऱ्या माझ्या दीराकडे २ छान गोधड्या पाठवल्या...आज माझ्या लेकीला त्यातली एक वापरायला देताना त्याची ऊब आणखीच जाणवली आणि आता गोधडीच राहिली की........ असे लक्ष्यात आल्यावर ती खूपच आठवली...

प्रेमाने दुसऱ्याला जिंकता येते,घर बांधून ठेवता येतं आणि कोणाकडून काही हव- नको नसताना सगळ्यावर जीवापाड प्रेम करता येतं असे मागच्या पिढीतल्या काही मोठ्या व्यक्तीं सहज करून जातं...त्यातलीच मामी आजी एक होती ....छोटस प्रेमाचे गावं.

तिच्या सत्तरीला तिच्यावर लिहिलेल्या काही ओळी पोस्ट करतेय...

मामी आजी

प्रसन्न असतो  चेहरा जीचा
अन मृदू आहे स्वभाव
जिच्या ठायी कधीच नाही 
मायेचा अभाव

न सांगताही अचूक घेते जी 
आपल्यांच्या मनाचा ठाव
अन प्रेमाने अलगद भरते
मनावर झालेला घाव

हाताला इतकी अनोखी चव
की जेवणावर आम्ही मारतो ताव
अन बायला(बायकोला) सांगतो आमच्या
आजीच्या हाताखाली कर सराव

नाती जपण आणि वाढवणं
हेच आहे जिचे गावं
तिच्यापाशी कधीच नाही 
गैरसमजाला ठावं

नितळ सात्विक चेहरा
अन नीटनेटका पेहराव
नकळत पडतो साऱ्यांवर
तुझ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव

उत्तम कर्म अन ईश्वर प्रेमाचा
आहे तुजला लगाव
सदैव होतं राहो आम्हावर
तुझ्या प्रेमाचा वर्षाव

- कल्याणी

Comments

Popular posts from this blog

The mystic meaning of Shree Saraswathi Yanthram

My next book is for all of you: Untold Nakshatra Jyotish (Fifth Edition)

Life Summary Report

New Book: Untold Planetary Transits -Simple Way to Accurately Predict Timing of Events

Vedic Astrology: Planetary Strengths or Graha Bala